किरण चौधरी | जामनेर, (प्रतिनिधी) : येथील सोनबर्डी टेकडी येथे जामनेर नगर परिषदेमार्फत प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत विविध कामे पूर्ण झाली आहेत. दरम्यान जामनेर नगर परिषदेतर्फे शुक्रवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
सोमेश्वर महादेव मंदिर, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, नाना नानी पार्क, लेझर शो, आर्टिफिशियल बीच, चौपाटी हे पर्यटक यांचे आकर्षक केंद्र झाले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. आज शुक्रवारी जामनेर नगर परिषदेतर्फे मुख्याधिकारी नितीन बागुल जामनेर नगर परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
स्वच्छता अभियान अंतर्गत सोनबर्डी टेकडी येथे साफसफाई करण्यात आली. यात पाच टन कचरा गोळा करण्यात आला. त्यामध्ये प्लास्टिक, पाण्याच्या बॉटल, रिकामे बाटल्या, खाद्यपदार्थांची रिकामे पाकिटे जमा करण्यात आले.
या मोहिमेत उपमुख्याधिकारी रविकांत डांगे, अभियंता प्रदीप धनके, अमर राऊत, पाणीपुरवठा अभियंता आर. डी. सूर्यवंशी, पल्लवी शेळके, आत्माराम शिंदे, अरुण जाधव, शेख बिलाल, गजानन गाडगे, गोकुळ मराठे, संदीप काळे आदी अधिकारी व सफाई कर्मचारी यांनी स्वच्छता करण्यासाठी परिश्रम घेतले. तसेच नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.