परिवर्तन मैत्र महोत्सवाच्या पाचव्या दिवशी कथ्थक नृत्य सादर
जळगाव, (प्रतिनिधी) : परिवर्तन विविध कलाना प्रोत्साहन देणारी संस्था असून मी या संस्थेचा घटक असल्याचे मत डॉ. राजेश पाटील यांनी मैत्र महोत्सवाच्या पाचव्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, केंद्र शासनातील अधिकारी गौरव बन्सल, समाजकल्याण वस्तीगृहाच्या अधिक्षका वैशाली पाटील, डॉ.राजेश पाटील, डॉ.सीमा पाटील, अपर्णा भट-कासार, अनिल कांकरिया, अनिस शहा यांच्या सोबत महोत्सव प्रमुख स्वरुप लुंकड, मानसी गगडानी, विनोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर प्रभाकर संगीत कला अकादमीच्या अपर्णा भट कासार यांच्या शिष्यांनी म “सतरंगी रे, ‘द रेनबो ऑफ इमोशन्स’ या कथ्थक नृत्यावर आधारित कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यात गणेश वंदना, सरस्वती वंदना, गुरुवंदना, नमो नमोजी शंकरा, टाळ बोले चिपळीला, गणेशस्तुती, ठुमरी रोको ना डगर मेरो शान, भजन कान्हा रे, ढग दाटूनी येतात, या गीतांवर नृत्य सादर केले. याप्रसंगी रसिकांनी एम्फी थिएटर संपूर्ण भरले होते. बावीस विद्यार्थी नृत्यांगनांनी आपला कलाविष्कार सादर केला. सूत्रसंचालन मंजुषा भिडे यांनी केले.