जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील कालिंकामाता मंदिर चौकात एका वाळूच्या डंपरने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली. यात ९ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर १३ वर्षीय मुलगी व दुचाकीस्वार गंभीर जखमी झालीची घटना बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. दरम्यान संतप्त जमावाने डंपरला यावेळी पेटवून दिले.
अपघातात योजस धिरज बऱ्हाटे (वय ९) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर बहीण भक्ती बऱ्हाटे (वय १२) व मामा योगेश बेंडाळे हे जखमी झाले आहे. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार योगेश बेंडाळे हे अयोध्यानगरात आपल्या बहिणीकडे आले होते. संध्याकाळी भाचा योजस व भाची भक्ती यांना दुचाकीवरून जेवणाचे पार्सल घेण्यासाठी जात असताना राष्ट्रीय महामार्गावर कालिका माता चौफुलीवर ही घटना घडली.
जमावाने डंपर पेटविला..
अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेल्यानंतर संतप्त जमावाने एकत्र येत या विना क्रमांक असलेल्या वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरला पेटवून दिले. दरम्यान महामार्गावर दोन्ही बाजूस वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी अग्निशमन दलाच्या बंबाला आग विझवण्यास जमावाने मज्जाव केला असता पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला.
आमदारांची घटनास्थळी धाव..
घटनेची माहिती मिळताच शहराचे आमदार सुरेश भोळे हे घटनास्थळी पोहोचले, त्यांनी संतापलेल्या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शहरातुन जात असलेल्या महामार्गावर अपघाताच्या घटना दररोज घडत असून आरटीओ आणि पोलिस विभागावर नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे