जळगाव, (प्रतिनिधी) : बारामती येथे होऊ घातलेल्या महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धा- २०२५ साठी जळगाव आणि नाशिक परिमंडलातील खेळाडू कर्मचाऱ्यांची एकत्रित अंतिम निवड करण्यासाठी शनिवारी दि. २१ डिसेंबर रोजी निवड चाचणी क्रीडा स्पर्धा झाल्या. धुळे येथे जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर झालेल्या निवड चाचणी स्पर्धेस खेळाडू कर्मचाऱ्यांनी उत्स्फ़ूर्त प्रतिसाद दिला. सुमारे २०० पेक्षा अधिक खेळाडू वीज कर्मचारी निवड चाचणीत सहभागी होते.
धुळे येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते निवड चाचणी स्पर्धांचे उद्घाटन झाले. यावेळी धुळेचे अधीक्षक अभियंता निरज वैरागडे, जळगावचे अधीक्षक अभियंता अनिल महाजन, मानव संसाधन विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक अशोक केदारे यांच्यासह इतर अधिकारी व क्रीडा नियोजन समितीतील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड चाचणी क्रीडा स्पर्धेतून निवडण्यात येणाऱ्या जळगाव व नाशिक परिमंडलातून खेळाडू कर्मचाऱ्यांची एकत्रित निवड बारामती येथील अंतिम स्पर्धेसाठी होणार आहे.
त्यासाठी या निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी इन-डोअर आणि आऊट – डोअर स्वरुपातील वैयक्तिक व सांघिक प्रकारचे पंचेवीस क्रीडा प्रकार घेण्यात आले. कब्बडी, खो-खो, वॉली बॉल, क्रिकेटसह बुध्दीबळ, कॅरम, व बॅटमिंटनसह विविध प्रकारचे पंचेवीस क्रीडा प्रकार खेळाविण्यात आले. स्पर्धेसाठी दोन्हीही परिमंडलातून पुरुष आणि महिला प्रवर्गातूनही खेळाडू कर्मचारी सहभागी झाले होते. प्रशिक्षक आणि निरिक्षकांच्या उपस्थितीत शांततेत या निवड चाचणी स्पर्धा संपन्न झाल्या.