जळगाव, (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील सावदा ते पिंपरुळ रस्त्यावर झाडाला कार धडकून झालेल्या भीषण अपघातात ३ तरुणांचा मृत्यू झाला होता. या अपघातातील गंभीर २ जखमींपैकी एकाचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे रावेर शहरात पुन्हा शोककळा पसरली आहे. दरम्यान घटनेप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते.
गणेश संतोष भोई (वय २७, रा. भोईवाडा, रावेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन भाऊ, बहीण, एक २ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. गणेश हा फोटोग्राफीचा व्यवसायद्वारे व त्याचे वडील हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.
दरम्यान शुक्रवारी दि. २० रोजी भुसावळ येथून हळदीच्या कार्यक्रमावरून रावेर येथे मित्रांसोबत परतत असताना सावदा ते पिंपरूळ रस्त्यावर त्यांची भरधाव कार झाडावर आढळल्याने भीषण अपघात झाला होता. या अपघातात शुभम दशरथ सोनार, मुकेश किशोर रायपूरकर, जयेश केशव भोई हे तीन विद्यार्थी मृत झाले होते तर गणेश भोई याच्यावर जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
आणखी एक जखमी विकी उदय जाधव याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, रविवारी खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना दुपारी २ वाजता सुमारास उपचारादरम्यान गणेशचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. रावेर शहरामध्ये यामुळे पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. घटनेची संबंधित पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.