तालुक्यातील मंगरूळ येथील घटना
अमळनेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील मंगरूळ येथे प्लास्टिक, भंगाराच्या दुकानाला आग लागल्याची घटना शुक्रवारी घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचं बोललं जात आहे. आगीत सुमारे ८ लाखाचे नुकसान झाले असून अग्निशमन दलाचे बंब वेळीच गेल्याने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.
मंगरूळ येथे दि. २० रोजी रात्री ७ वाजता एमआयडीसी परिसरात सैय्यद मुझफ्फर अली मोहम्मद अली यांच्या प्लास्टिक भंगार साहित्य शेडच्या बाहेर मोठ्या प्रमाणात ठेवलेले होते. जवळच विद्युत ट्रान्सफॉर्मर होता आणि तेथून विद्युत तार गेलेले होते. अचानक विद्युत तारा तुटून प्लास्टिक भंगाराला आग लागली. प्लास्टिकने लगेच पेट घेतल्याने आगीचे प्रमाण वाढले. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना घटना कळवताच त्यांनी आगीचे दोन बंब पाठवले. अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी, फारुख शेख, जफर पठाण, सत्येंन संदानशीव, दिनेश बिऱ्हाडे, आकाश संदानशीव, योगेश कंखरे, आकाश बाविस्कर, विकी भोई यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक विकास देवरे, सिद्धांत शिसोदे, नितीन कापडणे, चालक सुनील पाटील, पोलीस पाटील भागवत पाटील घटनास्थळी पोहचले. आग इतरत्र पसरू नये म्हणून दोन जेसीबी मशीन मागवण्यात येऊन उर्वरीत प्लास्टिक साहित्य वेगळे करण्यात आले. आगीमुळे विद्युत तारा तुटल्या तर ट्रान्सफॉर्मर जळाला आहे. तन्वीर अली याने अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात आगीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.