जळगाव, (जिमाका) : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम २०२४-२५ ज्वारी, मका व बाजरी (भरडधान्य) खरेदी करीता जळगाव जिल्ह्यात पणन महासंघाअंतर्गत एकूण १८ खरेदी केंद्र कार्यरत आहे. यात अमळनेर, पारोळा, चोपडा, एरंडोल, धरणगांव, पाळधी, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, शेंदुणीं, पाचोरा, भडगाव व चाळीसगाव याठिकाणी खरेदी केंद्र कार्यरत आहे.
मंत्री सर्वश्री, गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील,मंत्री संजय सावकारे, जिल्ह्यातील सर्व आमदार,विभागीय संचालक, उपाध्यक्ष श्री. रोहित दिलीपराव निकम, तसेच संचालक श्री. संजय मुरलीधर पवार यांच्या प्रयत्नाने सोयाबीन व भरडधान्य खरेदीच्या नोंदणीसाठी शासनाकडून मुदतवाढ प्राप्त झालेली आहे.
भरडधान्य व सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी ३१ डिसेबरपर्यंत शेतकरी नोंदणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ऑनलाईन नोंदणी करीता शेतकऱ्यांना आधारकार्ड, बँक पासबूक व ऑनलाईन पीकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा, ८अ इ कागदपत्रे आवश्यक आहे. २०२४-२५ चे हमीभाव ज्वारी (हायब्रीड) ३३७१ रुपये, मका २२२५ रुपये, बाजरी २६२५ रुपये, सोयाबीन ४८९२ रुपये आहेत.
भरडधान्य खरेदीसाठी संबंधीत शेतक-यांनी खरेदी केंद्रावर लाईव्ह फोटो देवून नोंदणी पूर्ण करावी आणि शेतकरी बंधुंनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एस. एस. मेने यांनी केले आहे.