पोलिस आणि मनपा अतिक्रमण विभागाच्या संयुक्त कारवाईत सहा पानटपऱ्या जप्त
जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील शैक्षणिक संस्थाच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पान टपरी चालकाविरुद्ध कोटपा कायद्याअंतर्गत पोलीस अधिक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांच्या सूचनेवरून कारवाई सुरू करण्यात आली आहे.
मंगळवार दि.१७ डिसेंबर रोजी शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या चौबे शाळा व मनपा शाळा क्रमांक १७ च्या १०० मीटर परिसरातील पान टपरी चालकांविरुद्ध कोटपा कायद्याअंतर्गत पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या पथकाने दंडात्मक कारवाई केलेल्या होत्या. तरी देखील सदर टपरी चालकांनी त्यांचे टपरी मध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरूच ठेवल्याने आज गुरूवार दि.१९ डिसेंबर रोजी शनिपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच महानगरपालिका अतिक्रमण निर्मून विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे संयुक्त कामगिरीतून शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीत चौबे शाळा व महानगरपालिका शाळा क्रमांक १७ या शाळांचे १०० मीटर परिसरात असलेल्या ६ पान टपरी पालकांच्या पान टपऱ्या कायमस्वरूपी हटवून महापालिकेने ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आलेली आहे.
पुढील दोन दिवसात शहरातील इतर पोलीस स्टेशन हद्दीतील शाळांच्या परिसरात असलेल्या पान टपरी चालकांविरुद्ध देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.
आज केलेल्या कारवाईत चौबे शाळेजवळील १) इकबाल शेख उस्मान शेख रा. इस्लामपुरा, २) शंकर लिंगा गवळी रा. गवळीवाडा जळगाव, ३) भिका लिंगा गवळी राहणार गवळीवाडा जळगाव, ४) गणी मोहमद डिगी रा. भिलपुरा जळगाव तसेच मनपा शाळा क्रमांक १७ बळीराम पेठ चे परिसरातील, ५) प्रकाश नामदेव पाटील रा बळीराम पेठ, ६) अब्दुल करीम शेख इसा राहणार काट्या फाईल जळगाव यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधिक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी सो यांनी सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनातून सदर कारवाईत पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मंसूरी, पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, युवराज कोळी, विजय खैरे, गिरीश पाटील, भागवत शिंदे, विकी इंगळे, अनिल कांबळे यांनी तसेच जळगाव महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी संजय ठाकूर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.