मुंबई, (वृत्तसंस्था) : पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे विविध पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांनी 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अमेरिकेतील रुग्णालयात झाकीर हुसैन यांच्यावर उपचार सुरु होते. झाकीर हुसैन यांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जगातील संगीत विश्वात पोकळी निर्माण झाली आहे.
झाकीर हुसैन हे सुप्रसिद्ध तबलावादक अल्लाह राखा खान यांचे पुत्र होते. झाकीर हुसैन यांनी अनेक भारतीय आणि परदेशी चित्रपटांना संगीत दिलं आहे. ‘साझ’ या सिनेमात त्यांनी अभिनयही केला आहे. झाकीर हुसैन यांनी वडील अल्लाह राखा खान यांच्यासह तबला वादनाचे धडे वयाच्या सातव्या वर्षापासून गिरवण्यास सुरुवात केली होती.
झाकीर हुसैन यांना १९८८ मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण, २०२३ मध्ये पद्मविभूषण या पुरस्करांनी गौरवण्यात आलं. तसंच १९९० मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा संगीत पुरस्कारही मिळाला होता. २००९ मध्ये झाकीर हुसैन ५१ व्या ग्रॅमी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. उल्लेखनीय बाब म्हणजे झाकीर हुसैन यांना त्यांच्या कारकिर्दीत ७ वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं त्यापैकी चारवेळा त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.