रावेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील मांगलवाडी येथील शेतमजूरी करणाऱ्या बाबूराव कोळी यांनी किडनी विकाराने त्रस्त झालेल्या २९ वर्षीय मुलीला वाचवण्यासाठी आपली किडनी दान करत तिला जीवदान दिले. अपत्यांवर संकट आल्यावर बापाच काळीज कसं असतं, याची प्रचिती रावेरकरांना दिसून आली.
मांगलवाडी येथील रहिवासी बाबूराव कोळी यांची मुलगी रुपाली योगेश कोळी (साळुंखे) या तरुणीच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याने अडीच वर्षापासून तरुणी डायलिसिसवर होती. मुंबई येथील बॉम्बे हॉस्पीटल मधील डॉ. हार्दीक शाह यांच्याकडे तीचे उपचार आणि डायलिसिस सुरू होते. मुलीच्या वेदना आणि दु:ख आई वडील अगदी जवळून अनुभवत होते. दरम्यान रुपालीचे वडील बाबूराव कोळी यांनी मुलीला किडनी देण्याचा संकल्प केला.
मुलीचे प्राण वाचविण्यासाठी वडील पुढे सरसावले. वडिलांच्या दातृत्वामुळे मुलीचा पुन:र्जन्म झाला. पितृप्रेमापुढे मृत्यूलाही हार मानावी लागली. शेतमजूरी करणारे कुटुंब आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तणावाखाली होते. पदरमोड करीत त्यांनी सर्वस्व पणाला लावले.
बॉम्बे हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. रुपालीला एक ६ वर्षाची मुलगी आहे. ज्यावेळी आपल्या लेकरावर कठीण प्रसंग येतो, त्यावेळी आपला जीवही धोक्यात घालायला ‘वडील’ मागेपुढे पाहत नाही, याची प्रचिती येथे बघावयास मिळाली.