केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या सूचना
नवी दिल्ली, (वृत्तसेवा) : देशातील शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत चांगल्या दर्जाची खते, बियाणे आणि कीटकनाशके मिळतील, याची खात्री केली पाहिजे. जर बनावट खते, बियाणे आणि कीटकनाशके मिळत असतील तर शेतकऱ्यांच्या हितासाठी दोषींवर कठोर आणि प्रभावी कारवाई राज्यांनी करायला हवी, अशा सूचना केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
नवी दिल्ली येथील कृषी भवन येथे कृषी मंत्रालयाचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. केंद्रीय कृषीमंत्री चौहान यांनी शेतकऱ्यांना उच्च दर्जाची कीटकनाशके, बियाणे आणि खते नेहमी उपलब्ध करून दिली पाहिजेत, यावर भर दिला. मंत्री चौहान म्हणाले की, आगामी पीक हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी ते लवकरच राज्यांचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.
याचे कारण म्हणजे प्रामुख्याने राज्यस्तरावरच प्रभावी उपाययोजना केल्या जातात. शेतकऱ्यांना दर्जेदार कीटकनाशके आणि खते मिळावीत यासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्रित मोहीम राबवावी, असेही केंद्रीय मंत्री चौहान यांनी सांगितले. या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी खते, बियाणे आणि कीटकनाशकांबाबत मोहीम राबवण्यासाठी कृती आराखडा तयार करून तो लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश दिले.
जेणेकरून ही मोहीम देशभरात कोट्यवधी शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारांमार्फत विनाविलंब प्रभावीपणे राबवता येईल. यावेळी चौहान म्हणाले की, यासंदर्भात शेतकऱ्यांकडूनही अभिप्राय, मते घेण्यात यावीत, कारण प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाच्या बी-बियाणांमुळे शेतकऱ्यांवरच प्रभाव पडतो आणि पिकांचे नुकसान होते.