भुसावळ विभागातील अनेक स्टेशनचा समावेश
जळगाव (प्रतिनिधी) : मुंबईतील आगामी महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी होणारी संभाव्य प्रचंड गर्दी लक्षात घेता भुसावळ विभागातील काही प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रित करणे आणि स्थानिक परिसरात प्रवाशांची सुरळीत हालचाल सुनिश्चित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवरील निर्बंध २ डिसेंबर ते ९ डिसेंबरपर्यंत राहणार आहे. भुसावळ विभागातील काही रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री प्रतिबंधित असेल. त्यामध्ये बडनेरा, अकोला, नांदुरा, मूर्तिजापूर, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद असेल.
प्रवास सुलभ व्हावा यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरज असलेल्या प्रवाशांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. दरम्यान सुरळीत आणि सुरक्षित प्रवास अनुभवण्यासाठी प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.