कठळे तुटलेले असल्याने मनपा प्रशासनावर संताप
जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील मोबाईल मार्केट म्हणून ओळख असलेल्या गोलाणी मार्केट येथे सोमवारी दि. २५ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास एक तरुण जिने उतरताना तोल जाऊन कठड्याना धरायला गेला. मात्र कठडे तुटलेले असल्याने ते त्याच्या हातात न आल्याने तो दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला. त्याला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.
फरदिन खान सादिक खान (वय ३२) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. तो सोमवारी दुपारी कामानिमित्त मार्केटमध्ये आला होता. काम आटोपून उतरत असताना तुटलेल्या जिन्यावरून त्याचा तोल जाऊन त्याने कठड्याना धरण्याचा प्रयत्न केला. मात्र ते गंजून तुटून गेलेले असल्यामुळे तो थेट दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला. त्याच्या चेहऱ्यावर, शरीराला गंभीर मार लागला.
फरदीनला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु आहे. मात्र तुटलेले जिने, गंजलेले कठडे हे धोकादायक स्थितीत झालेले असल्याने महानगरपालिका लक्ष द्यायला तयार नाही म्हणून व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला. महापालिका फक्त कर वसूल करते, मात्र सुविधेच्या नावाने केवळ बोंबच आहे, अशा प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिल्या आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने तत्काळ याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.