अमळनेर, दि. 06 – अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील विवाहिता वैशाली संतोष कोळी (वय-34) यांचा मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता इलेक्ट्रीक मोटारीच्या साह्याने पाणी भरत असताना विजेच्या धक्का बसलाने मृत्यु झाल्याची घटना घडली.
दरम्यान गावात नळांना पाणी आल्याने वैशाली कोळी यांनी इलेक्ट्रीक मोटार लावत पाणी भरण्याची लगबग सुरू होती. मात्र थोड्या वेळात विजपुरवठा खंडित झाला. यातच वैशाली यांनी पाणी भरून झाल्यानंतर इलेक्ट्रीक मोटरची पिन काढताना अचानक विज पुरवठा पुन्हा सुरु झाला. यातचं त्यांना विजेचा जबर धक्का बसल्याने जागेवरच त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला.
त्यांना ताबड़तोब अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यु झाला असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात शव विछेदन करून दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
वैशाली यांना एक मुलगी, एक मुलगा असून तिचे पती संतोष कोळी हे येथील पाडळसरे धरणावर इलेट्रीक कारागिर म्हणून कामाला आहे. तिच्या या अपघाती मृत्युने तिच्या मुलांचा व पतीचा आक्रोश मनाला हेलावनारा होता. या तरुण महिलेच्या अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याघटनेची वार्ता गावात सर्वत्र वाऱ्यासारखी पसरल्याने स्मशान शांतता झाली होती. दरम्यान मारवड पोलीस ठाण्यात अकस्माक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.