जळगाव, दि. 04 – शहरातील पिंप्राळा उपनगरातील सोमाणी मार्केटपासून सावखेडा व हुडको घरकुलांकडे जाणाऱ्या रस्त्यावरील डांबर पावसामुळे वाहून गेल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्डंमध्ये दररोज वाहनाधारकांचे अपघात होत असून नागरिकांना गंभिर दुखापती होत आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांसह रिक्षा चालकांकडून केली जात आहे.
तसेच रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास रिक्षा चालक व रस्त्यालगतच्या कॉलन्यांमधील नागरिकांकडून मनपासमोर उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमाणी मार्केटपासून गणपतीनगर( पिंप्राळा) रस्त्यावरील डांबर वाहून गेले आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून वाळू वाहून आलेली आहे. त्यामुळे दररोज दुचाकीस्वारांचे व रिक्षा चालकांचे अपघात होत आहेत.
सदर रस्त्यांवरुन दररोज हजारो वाहनांची वर्दळ असून मयुर कॉलनी, सोनी नगर, गणपती नगर, माधव नगर, सुख अमृत नगर, ओंकार पार्क, कुंभार वाडा, बारी वाडा, भोई वाडा, अपना घर, आझाद नगर, हुडको घरकुल, खंडेराव नगरसह अनेक कॉलन्यांच्या नागरिकांची दररोजची ये-जा या रस्त्यावरुन आहे. या सर्व नागरिकांना रस्त्यामुळे तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याची दखल घेवून तातडीने रस्त्याची दुरुस्त करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.