जळगाव | दि. ०३ ऑगस्ट २०२४ | तरसोद ते पाळधी या बायपास रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरु असून कामाला गती देऊन लवकरात लवकर रस्ता सुरु झाला पाहिजे अशी मागणी शहराचे आ. सुरेश भोळे (राजुमामा) यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शनिवारी झालेल्या ‘दिशा ‘ (जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती) च्या बैठकीत केली.
यावेळी केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे, खा. स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, आ. संजय सावकारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, ग्रामीण विकास प्रकल्पाचे संचालक आर. एस. लोखंडे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी आ. भोळे म्हणाले की, आकाशवाणी चौक ते अजिंठा चौक येथे दररोज वाहतूक जाम होते. ट्रॅफिकचा प्रश्न सुटला पाहिजे. तसेच महामार्गावरील खड्डे बुजले गेले पाहिजेत असेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे पैसे वेळेवर मिळावे, सिटी सर्व्हेतील नागरिकांच्या अडचणी सुटल्या पाहिजेत, महावितरणच्या नवीन सबस्टेशनच्या जागेचा प्रश्न सुटला पाहिजे असे विविध विषयदेखील आ. भोळे यांनी मांडले. तर महानगरपालिकेचे विविध विषय प्रलंबित आहेत. त्याविषयी सोमवार दि. १२ ऑगस्ट रोजी महानगरपालिकेत खा. स्मिता वाघ यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.