अमळनेर, दि.०४ – तालुक्यातील कळमसरे येथील मारवड रस्त्यालगत असलेल्या एका गुरांच्या गोठ्याला रविवारी दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने त्यावेळी गोठ्यात गुरे नव्हती. दरम्यान गोठ्याच्या जवळच साठवून ठेवलेल्या चाऱ्यासह शेतीची अवजारे आगीत जळून खाक झाली.
सविस्तर वृत्त असे की, कळमसरे येथील यादव किसन चौधरी यांच्या मारवड रस्त्यालगत असलेल्या शेतातील गोठ्याला रविवारी दुपारी अचानक आग लागल्याने वर्षभरासाठी साठवून ठेवलेला गुरांचा चारा, शेतासाठी लागणारी महागडी अवजारे, ठिबक तसेच पाईप रासायनिक खतांच्या थैल्या जळून पूर्णतः नष्ट झाल्या.
या घटनेमुळे शेतकऱ्याचे सुमारे अडीच ते तीन लाखांचे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. शेतातील मेंढपाळ व सालदार यांच्या मदतीने आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, मात्र वारा सुरू असल्यामुळे वेळेत आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही.
डोळ्यासमोर गोठ्यातील साहित्य जळून राख होताना बळीराजाला पहावे लागले. ते चित्र पाहूनसशेतकरी यादव चौधरी व त्यांचा मुलगा धनराज चौधरी यांना आश्रू अनावर झाले, घटनेची माहिती तहसील कार्यालयात कळवण्यात आल्याने तलाठी गौरव शिरसाठ यांना तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले.