चाळीसगाव , प्रतिनिधी :शिरूड चौफुली येथून चाळीसगावकडे शिवशाही बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या बॅगेतून अज्ञात महिलांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि २ लाख ८० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी घडली. या चोरीत एकूण ४ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला असून, याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुनंदाबाई दिनकर पाटील (वय ५८, रा. मोरदड, ता. जि. धुळे) यांनी फिर्याद दिली आहे. सुनंदाबाई या मुलगी मनिषासह २४ नोव्हेंबर रोजी सकाळी मोरदड येथून बसने शिरूड चौफुली येथे आल्या होत्या. तेथून सकाळी ११.३० वाजता चाळीसगावकडे जाणाऱ्या शिवशाही बसमध्ये (एमएच १४, एनपी ३१५७) त्या बसल्या.

प्रवासादरम्यान त्यांनी आपली बॅग बसच्या डाव्या बाजूला ठेवली होती, तर त्या मुलीसह उजव्या बाजूला बसल्या होत्या. दरम्यान, शिरूड चौफुली येथून चार ते पाच अनोळखी महिला बसमध्ये चढल्या आणि संबंधित बॅगेजवळ बसल्या. मेहुणबारे बसस्थानकावर या महिला उतरून गेल्यानंतर बस वाहकाने सुनंदाबाई यांना बॅग तपासण्यास सांगितले.
बॅग तपासली असता त्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी ३० ग्रॅम वजनाचा सोन्याचा चपला हार, १५ ग्रॅमचे सोन्याचे गोप, ३ ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स, ३ ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा, १७ ग्रॅमची सोन्याची पोत, ४० भार वजनाचे चांदीचे कडे, ७ भार वजनाचे चांदीचे ब्रेसलेट तसेच ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटांमधील २ लाख ८० हजार रुपयांची रोकड असा एकूण ४ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या घटनेमुळे बसप्रवासात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते करीत आहेत.









