जामनेर प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत शिवारातून काही दिवसांपूर्वी चोरीला गेलेली सव्वा लाखांची बैलजोडी शोधण्यात पहूर पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला टेम्पोसह एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी पिंपळगाव गोलाईत येथील शेत गट क्रमांक १०७ मधून मावळी जातीची ७ ते ोर वर्षे वयाची बैलजोडी (किंमत १ लाख ५ हजार रुपये) अज्ञात चोरट्यांनी लांबवली होती. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रवीण दातरे यांनी तपास पथक नेमले होते. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संजय प्रल्हाद पाटील व ज्ञानेश्वर गणपत पाटील (दोघे रा. सोनाळा) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी साथीदार दिनेश उर्फ टेलर जगन्नाथ पाटील व ईश्वर कडू पाटील यांच्या मदतीने बैल चोरल्याची आणि ती सुनसगाव येथील एका व्यापाऱ्याला विकल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी सुनसगाव येथून पिंटू उर्फ नरेंद्र प्रल्हाद गोखरे याच्या शेतातून बैलजोडी हस्तगत करून ती मूळ मालकाच्या सुपूर्द केली. चोरीचा माल विकत घेतल्याप्रकरणी पिंटू गोखरेविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सपोनि प्रवीण दातरे, उपनिरीक्षक गणेश सुस्ते व पथकाने पार पाडली असून, पुढील तपास हवालदार दीपक पाटील करत आहेत.










