जळगाव, प्रतिनिधी : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात एका थरारक घटनेने खळबळ उडाली आहे. भावाच्या प्रेमसंबंधाला विरोध असल्याच्या कारणावरून एका युवकाने आपल्या साथीदाराच्या मदतीने भावाला आणि त्याच्यासोबत दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेवर पिस्तुलाने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी महिला गोपाळपुरा परिसराची रहिवासी असून, ती कंपनीत मजुरी करून आपल्या दोन मुलांचा सांभाळ करते. गेल्या तीन वर्षांपासून तिचे सोनीनगर (पिंप्राळा) येथील रोहन मधुकर सपकाळे (३०) याच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र, रोहनचा भाऊ अनिकेत मधुकर सपकाळे याचा या संबंधांना तीव्र विरोध होता. याच वादातून दोन दिवसांपूर्वी कुटुंबात भांडण झाले होते, ज्यामुळे रोहन घराबाहेर राहत होता.

मंगळवारी (२० ऑक्टोबर) रात्री रोहन आणि ती महिला मेहरुण ट्रॅक परिसरातील रावणदहन कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. यादरम्यान अनिकेत सतत रोहनला फोन करून त्याच्या ठिकाणाची विचारणा करत होता. कार्यक्रमानंतर मध्यरात्री साडेबारा ते पावणेएकच्या सुमारास रोहन आणि ती महिला जेवणाचे पार्सल आणण्यासाठी दुचाकीवरून निघाले. ते टॉवर चौकाकडून गोपाळपुराकडे जात असताना जुन्या बसस्थानकासमोर पोहोचले.
त्याच वेळी अनिकेत आपल्या एका साथीदारासह दुसऱ्या दुचाकीवरून त्यांच्या मागे आला. त्याने महिलेला शिवीगाळ करत रोहन आणि तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलातून गोळीबार केला. यात एक गोळी महिलेच्या डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ लागल्याने ती रस्त्यावर कोसळली. यानंतर दोन्ही संशयित घटनास्थळावरून पसार झाले. रोहनने तातडीने महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
जखमी महिलेच्या जबाबावरून अनिकेत सपकाळे आणि त्याच्या अज्ञात साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दसऱ्याच्या रात्री शहरातील अतिशय गजबजलेल्या समजल्या जाणाऱ्या जुन्या बसस्थानक परिसरात झालेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, शहर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.









