जळगाव, प्रतिनिधी : जळगाव-भुसावळ महामार्गावरील नशिराबादजवळ असलेल्या टोलनाक्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा बनला आहे. टोलवरील कोंडीमुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

जळगाव-भुसावळ महामार्ग हा या परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. मात्र, नशिराबादजवळील टोलनाक्यावर वाहतूक कोंडी झाल्यास वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. प्रवाशांचा वेळ वाया जात असून, तातडीच्या कामासाठी प्रवास करणाऱ्यांनाही या कोंडीचा त्रास सहन करावा लागतो.

या परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना देखील आला, दरम्यान त्यांनी टोल कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली. टोल व्यवस्थापनाने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी योग्य नियोजन करावे आणि वाहनधारकांना विनाकारण ताटकळत राहावे लागू नये, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.








