अमळनेर, प्रतिनिधी : शहरातील बंद घरांना लक्ष्य करून घरफोड्या करणाऱ्या मध्य प्रदेशातील दोन संशयित चोरट्यांना अमळनेर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. संशयितांकडून तीन घरफोडीच्या गुन्ह्यांतील सोन्या-चांदीचे दागिने तसेच चांदीची गणेशमूर्ती आणि लक्ष्मीची नक्षीकाम केलेली चांदीची नाणी हस्तगत करण्यात आली आहेत.

नवलसिंह बनसिंह अलावा (वय ३९, रा. काकडवा, ता. कुक्षी, जि. धार, मध्य प्रदेश) आणि केरु उर्फ केहरु इडिया डाबर (वय ४५, रा. बलेडी गलबेडा फलिया, ता. जोबट, जि. अलीराजपूर, मध्य प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना नवलसिंह अलावा याचा या गुन्ह्यांतील सहभाग असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला तांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेत अटक केली. चौकशीदरम्यान त्याने साथीदार केरु उर्फ केहरु डाबर याच्यासोबत अमळनेर शहरात वेगवेगळ्या वेळी घरफोड्या केल्याची माहिती दिली.

संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जानेवारी २०२६ रोजी रात्री अमळनेर शहराबाहेरील शेतांमध्ये मोटारसायकल उभी करून ते मध्यरात्रीनंतर नदीजवळील वसाहतीत गेले. तेथे बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर ३ एप्रिल २०२६ रोजी सिमेंट काँक्रिट रोडजवळील वसाहतीतील बंद घराचे कुलूप तोडून दागिने चोरल्याची माहितीही चौकशीत समोर आली. तसेच २४ ऑगस्ट २०२६ रोजी याच परिसरातील एका बंद घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील १० हजार रुपये रोख, चांदीची गणेशमूर्ती आणि लक्ष्मीचे नक्षीकाम केलेले गोल चांदीचे नाणे चोरून नेल्याची कबुली संशयिताने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
नवलसिंह अलावा याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांचे पथक मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील जोबट तालुक्यातील बलेडी गावात रवाना झाले. तेथून केरु उर्फ केहरु डाबर याला ताब्यात घेऊन अमळनेर येथे आणण्यात आले. त्यालाही संबंधित गुन्ह्यांत अटक करण्यात आली.
या कारवाईत अमळनेर पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यांतील चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये ९० ग्रॅम वजनाची चांदीची गणेशमूर्ती, २० ग्रॅम वजनाचे लक्ष्मीचे चांदीचे नाणे, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची गोळी, ५० ग्रॅम चांदीचा तुकडा, १४ ग्रॅम वजनाचे चांदीचे चार कडे, पाच ग्रॅम आणि एक ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, २३ ग्रॅम वजनाचे दोन चांदीचे करदोडे, २५ ग्रॅम वजनाचे दोन जोड चांदीचे वाळे आणि १८ ग्रॅम वजनाचे चांदीचे चार कडे यांचा समावेश आहे.
हा मुद्देमाल अमळनेर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ४४६/२०२६, ३२/२०२६ आणि १५९/२०२६ या प्रकरणांशी संबंधित असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोते आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, पोलीस नाईक सूर्यकांत साळुंखे, पोलीस कर्मचारी प्रशांत पाटील, उज्ज्वल पाटील, नितीन मनोरे, उज्ज्वलकुमार म्हस्के, नितीन कापडणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करीत आहेत.









