टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पथराड–पाळधी खुर्द ३३/११ केव्ही वीज उपकेंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नाला खोलीकरण, जलसंधारण व शेतरस्त्यांच्या कामांना प्राधान्य

जळगाव प्रतिनिधी : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळेल, असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नाला खोलीकरण, पाणी अडविणे, जलसंधारण तसेच शेतरस्त्यांच्या कामांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर धरणगाव तालुक्यातील टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत नवीन वीज उपकेंद्र लवकरच मंजूर करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.
धरणगाव तालुक्यातील पथराड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ३३/११ केव्ही पथराड–पाळधी खुर्द वीज उपकेंद्राचे त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. या उपकेंद्रामुळे परिसरातील गावांना तसेच शेतीपंपांना अधिक सक्षम व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.
नवीन उपकेंद्रामुळे या गावांना मिळणार लाभ
पथराड–पाळधी खुर्द उपकेंद्रामुळे पथराड गावठाण फीडरअंतर्गत पथराड, धार व शेरी या गावांना लाभ होणार आहे. दोनगाव गावठाण फीडरअंतर्गत टहाकळी, फुलपाट, आव्हाणी, भोकणी, दोनगाव तसेच पाळधी खुर्द येथील सागर कॉलनी परिसराला अधिक सक्षम वीजपुरवठा उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे पथराड शेती फीडरअंतर्गत निमखेडे–झुरखेडा शिवार, पथराड, पाळधी खुर्द, टहाकळी आणि फुलपाट परिसरातील शेतीपंपांनाही लाभ मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाचे नियोजन करणे सुलभ होणार असून, घरगुती वीज ग्राहकांनाही दिलासा मिळणार आहे.
*पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, दुष्काळात शेतकऱ्यांना पाण्याइतकाच सुरळीत वीजपुरवठाही महत्त्वाचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे. दुष्काळामुळे विजेची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महावितरणने रोहित्रांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. तसेच तांत्रिक बिघाडामुळे शेतकऱ्यांचा वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.*
*सूतगिरणी व चॉकलेट उद्योगातून मिळणार रोजगार*
जनतेच्या सहकार्यामुळे धरणगाव तालुक्यासह जिल्ह्यात विविध विकासकामे मार्गी लागत आहेत. पाणी, रस्ते आणि वीज या मूलभूत सुविधांबरोबरच ग्रामीण भागात उद्योग उभे राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने धरणगाव तालुक्यात प्रस्तावित सूतगिरणीच्या कामाला दिवाळीपर्यंत सुरुवात करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, या परिसरात चॉकलेट निर्मितीचा उद्योगही लवकरच सुरू होणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. या उद्योगांमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
*दरम्यान, पथराड–पाळधी खुर्द वीज उपकेंद्राचे काम निर्धारित मुदतीत पूर्ण केल्याबद्दल पालकमंत्री पाटील यांनी मे. गार्गी इलेक्ट्रिकलच्या कॉन्टॅक्टर विशेष कौतुक केले. यावेळी जेडीसीसी बँकेचे चेअरमन संजय पवार, डी. जी. भाऊसाहेब पाटील, पी. एम. पाटील, भगवान महाजन यांनीही मनोगत व्यक्त केली*
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक अभियंता लोकेश चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सहायक अभियंता रत्ना पाटील यांनी केले.
यावेळी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,डी.जी. पाटील,पी. सी. पाटील,. गार्गी इलेक्ट्रिकलच्या कॉन्टॅक्टर यामिनी नारखेडे, पी. एम. पाटील,डी. ओ. पाटील, दिनेश पाटील, ॲड. संजय महाजन, भगवान महाजन, सचिन पवार, रवी चव्हाण, संजय पाटील, प्रेमराज पाटील, अनिल पाटील, गोकुळ लंके, श्रीकांत चव्हाण, दिलीप पाटील, किशोर झंवर, अनिल कासट, मे. गार्गी इलेक्ट्रिकलच्या यामिनी नारखेडे यांच्यासह परिसरातील सरपंच, शेतकरी, विविध पक्षांचे पदाधिकारी, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
**************









