जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग ७ ‘ड’ मधील राजकीय चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचाराला जनसामान्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या रॅलीचे रूपांतर एका मोठ्या विजयोत्सवात होताना दिसत आहे. अत्तरदे यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे विरोधकांच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरली आहे.
चंद्रशेखर अत्तरदे प्रभागात प्रचारासाठी निघाल्यावर ठिकठिकाणी नागरिक स्वयंस्फूर्तीने घराबाहेर येऊन त्यांचे स्वागत करत आहेत. विशेषतः महिला भगिनींकडून त्यांचे उत्साहात औक्षण केले जात असून, तरुणांमध्ये अत्तरदे यांच्याबद्दल मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. “आपला माणूस, हक्काचा माणूस” अशा भावना प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत.
चंद्रशेखर अत्तरदे यांनी गेल्या काही वर्षांत केलेल्या सामाजिक कार्याची पावती आज त्यांना जनसामान्यांच्या प्रेमातून मिळत आहे. स्वच्छ प्रतिमा आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारा नेता, अशी त्यांची ओळख प्रचारात जमेची बाजू ठरत आहे. महायुतीच्या माध्यमातून प्रभागाचा कायापालट करण्याचे आश्वासन त्यांनी दिले असून, मतदारांनी देखील विकासाच्या या मुद्द्याला कौल दिला आहे.
“चंद्रशेखर अत्तरदे हे केवळ उमेदवार नाहीत, तर ते आमच्या कुटुंबातील एक सदस्य आहेत. त्यांच्या कामावर आमचा पूर्ण विश्वास आहे, म्हणूनच आम्ही पूर्ण शक्तीने त्यांच्या पाठीशी उभे आहोत.”
— हिरकणाबाई पाठक (रहिवासी, शिव कॉलनी)
’एकच वादा, चंद्रशेखर दादा’..
प्रभागात महायुतीच्या कार्यकर्त्यांचे जाळे अत्यंत प्रभावीपणे काम करत आहे. प्रत्येक गल्ली आणि मोहल्ल्यात अत्तरदे यांच्या नावाचा गजर होत असून, ‘एकच वादा, चंद्रशेखर दादा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून जात आहे. नागरिकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, महायुतीचा हा बालेकिल्ला अधिक भक्कम झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.








