जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील शाहूनगरनजीकच्या एका मॉलमधील चित्रपटगृहात एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यात शौचालयात गेलेल्या १९ वर्षीय तरुणीचे शेजारील शौचालयातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने अर्धनग्न अवस्थेतील चित्रीकरण केले. ही घटना २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?..
ठाणे येथील रहिवासी असलेली १९ वर्षीय तरुणी दिवाळीच्या निमित्ताने जळगावातील तिच्या मामाकडे आली आहे. २४ ऑक्टोबर रोजी ती तिच्या आई आणि मावशीसह शहरातील एका मॉलमधील चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. संध्याकाळी चित्रपट संपल्यानंतर तरुणी शौचालयात गेली. त्याचवेळी, शेजारील शौचालयाच्या दारातून एक मुलगा मोबाईलमध्ये तिचे चित्रीकरण (व्हिडिओ रेकॉर्डिंग) करत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. ही गोष्ट पाहून तरुणीला मोठा धक्का बसला आणि ती घाबरली.
पोलिसांत तक्रार दाखल..
घडल्या प्रकारामुळे तरुणी सुरुवातीला घाबरली असल्याने तिने तत्काळ तक्रार दिली नाही. मात्र, या गंभीर घटनेची नोंद घेत तरुणीने २४ ऑक्टोबर रोजी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तातडीने १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलाने चित्रपटगृहासारख्या सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे गैरवर्तन केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.










