जळगाव, (प्रतिनिधी) : रत्नागिरी येथे नुकत्याच पार पडलेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर कुमार गट अजिंक्यपद स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन आणि जैन स्पोर्टस् अकॅडमीची खेळाडू निकिता दिलीप पवार हिने दैदीप्यमान यश मिळवले आहे. निकिताने मुलींच्या ५५ किलो आतील वजन गटात सुवर्णपदक पटकावून बंगळूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात आपले स्थान निश्चित केले आहे.
निकिता पवार हिने यापूर्वीही आपला उत्कृष्ट खेळ दाखवला आहे. नुकत्याच झालेल्या शालेय राज्य स्पर्धेत देखील तिने सुवर्णपदक जिंकले होते आणि शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. या दुहेरी यशाने तिने जळगाव जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी तिला प्रशिक्षक जयेश बाविस्कर आणि अजित घारगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
निकिताच्या यशाबद्दल जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, खजिनदार सुरेश खैरनार, सचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, सौरभ चौबे यांच्यासह जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन आणि जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या पदाधिकाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.










