जळगाव, (प्रतिनिधी) : नवरात्र उत्सवाच्या पवित्र पर्वावर श्री महालक्ष्मी मित्र मंडळ, महाजन नगर, रामेश्वर कॉलनी येथे ‘श्रीशाम सुमरण भजन संध्या’ या भक्तिमय कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. महालक्ष्मी मंडळाचे अध्यक्ष तथा युवा उद्योजक अल्पेश देवरे आणि अभिषेक कासार यांच्यामार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचा शुभारंभ जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांच्या शुभहस्ते ज्योत प्रज्वलित करून करण्यात आला. या वेळी माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भक्तांना धार्मिक अनुभूती मिळावी, या उद्देशाने या भजन संध्येचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील नागरिक, महिला आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय वातावरणाचा लाभ घेतला.
आरोग्य शिबिराचे आवाहन..
यासोबतच, महालक्ष्मी मित्र मंडळातर्फे समाजोपयोगी उपक्रमांची मालिका सुरू ठेवत, २७ सप्टेंबर रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्यांनी परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.