जळगाव, (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या दिनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी पुढील काही वर्षांत जिल्ह्याची अर्थव्यवस्था $२५ अब्ज (बिलियन डॉलर्स) पर्यंत नेण्याचा संकल्प व्यक्त केला. जिल्ह्याने शेतकरी कल्याण, महिला सक्षमीकरण, आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा आणि ग्रामविकास या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती साधली आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
दरम्यान त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला:
▪️शेतकरी: प्रधानमंत्री पीक विमा योजनेत २.२९ लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. ५४ कोटी रुपयांची विमा भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे.
▪️महिला सक्षमीकरण: महिला व बाल विकास भवन आणि ‘सखी वन स्टॉप सेंटर’ सुरू झाले आहे. ‘बहिणाबाई मार्ट’ संकल्पना यशस्वी झाली असून जिल्ह्यात ११ मार्ट कार्यरत आहेत. महिला बचत गटांना ४३० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून, यंदा १००० कोटींचे उद्दिष्ट आहे. ‘आदिशक्ती अभियान’ अंतर्गत महिलांना १ लाख ते १० लाख रुपयांपर्यंतचे पुरस्कार दिले जातील.
▪️आरोग्य: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ५७ कोटी रुपयांच्या निधीतून थ्रीटी, सीटी स्कॅन, आयसीयू यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
▪️पायाभूत सुविधा: पाळधी-तरसोद १७ किमी बायपास लवकरच सुरू होईल. प्रदूषणमुक्त प्रवासासाठी ८९ नवीन बसेस, तसेच चोपडा आणि जळगाव डेपोसाठी ई-बसेस मिळाल्या आहेत.
▪️आवास योजना: पंतप्रधान आवास आणि इतर योजनांतर्गत २,७५,००० घरांना मान्यता मिळाली असून, १,२२,००० कुटुंबांना हक्काचे घर मिळाले आहे.
जिल्ह्याची सुरक्षा आणि प्रशासकीय सुधारणा या क्षेत्रांतही भरीव प्रगती झाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचा राज्यस्तरावर गौरव झाल्याचा उल्लेख त्यांनी केला.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह स्वातंत्र सैनिक, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.