जामनेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुण सुलेमान रहीम पठाण याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत आणखी चार संशयितांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची एकूण संख्या आता आठ झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सुलेमानच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याला मारहाण करणाऱ्या तरुणांची संख्या १५ पेक्षा अधिक होती.
या प्रकरणी पोलिसांनी ‘मॉब लिंचिंग’चा गुन्हा दाखल केला आहे. सुलेमानला नेमके कुठे नेऊन मारहाण करण्यात आली, यासाठी कोणत्या वाहनाचा वापर झाला, तसेच ज्या कॅफेमध्ये ही घटना घडली, त्या ठिकाणच्या संगणकातील डाटा मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. या गुन्ह्यात आणखी संशयितांचा सहभाग असण्याची शक्यता असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.










