जळगाव, (प्रतिनिधी) : शहरतील न्यू स्टेट बँक कॉलनीमध्ये एका भाड्याच्या घरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा रामानंद नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून या रॅकेटचा छडा लावला. या कारवाईत पोलिसांनी वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या एका दाम्पत्यासह तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे.
अशी झाली कारवाई..
रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना न्यू स्टेट बँक कॉलनीतील एका घरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी पोउनि सचिन रणशेवरे, पोहेकॉ सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, मनोज सुरवाडे, विनोद सुर्यवंशी, रेवानंद साळुंखे, योगेश बारी यांचे एक पोलीस पथक तयार केले. या पथकाने एक बनावट ग्राहक (डमी) तयार करून त्याला संबंधित ठिकाणी पाठवले. या डमी ग्राहकाने खात्री झाल्यावर पोलिसांना मिस कॉल देऊन इशारा केला. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून त्या दोन मजली इमारतीवर छापा टाकला.
या छाप्यात पोलिसांनी वेश्याव्यवसाय चालवणारा दिनेश संजय चौधरी (वय ३५) आणि त्याची पत्नी यमुना राकेश प्रजापती (भारती दिनेश चौधरी) (४२, रा. देवेंद्र नगर, ह.मु न्यू स्टेट बँक कॉलनी) यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्यासोबत तीन तरुणही आढळून आले, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पश्चिम बंगालच्या महिलेची सुटका..
या कारवाईदरम्यान पोलिसांनी पश्चिम बंगाल येथील एका महिलेची सुटका केली आहे. हे दाम्पत्य तिला जास्त पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून बळजबरीने देहविक्रीचा व्यवसाय करून घेत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून रोकड आणि काही आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिनेश चौधरी आणि त्याची पत्नी यमुना राकेश प्रजापती (भारती दिनेश चौधरी) यांच्याविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.