जळगाव, (प्रतिनिधी) : बालरंगभूमी परिषद आणि वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने, १२ ऑगस्ट रोजी ‘इतिहास महाराष्ट्राचा’ हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावर्षीच्या उपक्रमाचा विषय ‘छत्रपती शिवाजी महाराज – श्री शिवजन्मोत्सव ते श्री शिवराज्याभिषेक’ असा आहे. या स्पर्धेचा उद्देश मुलांमध्ये ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा आदर्श रुजवून त्यांच्यामध्ये सकारात्मक विचार निर्माण करणे हा आहे.
जळगावातील वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालयाच्या सभागृहात सकाळी ९ वाजल्यापासून या उपक्रमाची प्राथमिक फेरी सुरू होईल. स्पर्धेत ५ ते १० वर्षे आणि ११ ते १५ वर्षे अशा दोन वयोगटांतील मुलांसाठी एकल गट आहेत, तसेच समूह गटही आहे. स्पर्धकांना शिवाजी महाराजांच्या जीवनातील शौर्यगाथा, विविध प्रसंग आणि पराक्रम नृत्य, नाट्य किंवा संगीताच्या माध्यमातून सादर करायचे आहेत.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. प्रत्येक सहभागी मुलाला सहभाग प्रमाणपत्र मिळेल. प्राथमिक फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांना २३ व २४ ऑगस्ट रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल येथे होणाऱ्या अंतिम फेरीत सहभागी होण्याची संधी मिळेल. अंतिम फेरीसाठी येणाऱ्या-जाणाऱ्या खर्चाची व्यवस्था आयोजकांकडून केली जाईल.
या उपक्रमात जास्तीत जास्त मुलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ७६२०९३३२९४ किंवा ८८३०२५६०६८ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.