जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली ते दापोरा रस्त्यावर शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी एक दुर्दैवी घटना घडली. येथे विजेच्या खांबाला असलेल्या तारेमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने एका गाभण म्हशीला जोरदार धक्का बसला. या धक्क्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. यामुळे म्हशीच्या मालकाचे सुमारे ९० हजार रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोली येथील माजी ग्रामपंचायत सदस्य शेख रऊफ शेख मुजाहिद (वय ५९) यांच्या मालकीची ही म्हैस होती. नेहमीप्रमाणे, शुक्रवारी सकाळी ते आपल्या म्हशींना दापोरा रस्त्यावरील परिसरात चरायला घेऊन गेले होते. त्याचवेळी, त्यांच्या म्हशीने चुकून विजेच्या खांबाला स्पर्श केला. खांबाच्या तारेत विद्युत प्रवाह उतरल्याने तिला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे शेख रऊफ यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली. शासकीय रुग्णालयातील पशुवैद्यकांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तसेच, एमआयडीसी पोलिसांनीही या घटनेची नोंद केली आहे.
या घटनेनंतर शिरसोली गावातील ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांनी पशू मालक शेख रऊफ यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. तसेच, पावसाळ्याच्या दिवसांत अशा घटना टाळण्यासाठी महावितरण कंपनीने गावातील सर्व विद्युत खांबांची आणि तारांची योग्य तपासणी करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.