मुक्ताईनगर, (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यश मिळवून थांबू नये, तर आपल्या शाळा, शिक्षक, आणि पालकांप्रती असलेला ऋणानुबंध जपून समाजासाठीही योगदान द्यावं, असं आवाहन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने ‘प्रज्ञावंतांचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा’ आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते.
मुक्ताईनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात, देवकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘चांगली संगत, निश्चित ध्येय, आणि अभ्यासातील सातत्य यांमुळेच यश मिळवता येतं.’ यावेळी त्यांनी युवा पिढीला योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरणा दिली.
कार्यक्रमादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भाग्यश्री ठाकरे यांनीही विद्यार्थ्यांना संघटनेच्या कार्याबद्दल माहिती दिली. या सोहळ्यात एकूण ५०० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणे, डॉ. भूषण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोपाळ पाटील, आसिफ बागवान, विजय सोनार, राकेश सोनार, आणि निवृत्ती ढोले यांसारखे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अश्विन सुरवाडे यांनी केलं, तर प्रवीण राठोड यांनी सूत्रसंचालन आणि सोपान दूट्टे यांनी आभार प्रदर्शन केलं.