जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पावसाळा सुरू होताच नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाल्याने गिरणा धरणातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी साधारण २१ टक्के असलेला जलसाठा आता वाढून ३९.६६ टक्क्यांवर पोहोचला आहे.
गिरणा पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, ५ जुलै रोजी सायंकाळपर्यंत धरणात १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चणकापूर आणि पुनद धरणांतून ठेंगोळा बंधाऱ्यामार्फत गिरणा धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा वाढत असून, शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सध्या सुरू असलेला पाऊस असाच नियमित राहिल्यास पुढील आठवड्यात गिरणा धरणातील जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. यामुळे आगामी काळात शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.