जळगाव, (प्रतिनिधी) : येथील भरारी फाउंडेशन, वेगा केमिकल्स आणि रोटरी क्लब मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका हृदयस्पर्शी कार्यक्रमात जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या २५० मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य आणि वार्षिक शुल्क वाटप करण्यात आले. पोलीस कवायत मैदान परिसरातील पद्मालय सभागृहात झालेल्या या उपक्रमाचे हे ११ वे वर्ष असून, ‘शेतकरी संवेदना’ या अभियानांतर्गत भरारी फाउंडेशनने आतापर्यंत एकूण ६५० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे.
यावेळी ४० विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी द गार्डियन्स फाउंडेशन आणि इतर दानशूर व्यक्तींच्या मदतीने सहकार्य करून दत्तक घेतले जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या खा. स्मिता वाघ यांनी भरारी फाउंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचे आणि शेतकरी आत्महत्यांसारख्या संवेदनशील विषयावर केलेल्या कामाचे कौतुक केले. त्यांनी संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले.
जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन आणि भालचंद्र पाटील यांनी या संवेदनशील उपक्रमांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना भविष्यात वेगा केमिकल्स, जैन उद्योग समूह आणि जळगाव पीपल्स बँकेत नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाउनतर्फे जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन ॲड. किशोर पाटील यांनी दिले. या उपक्रमासाठी भालचंद्र पाटील, जैन उद्योग समूह, ॲडव्होकेट किशोर पाटील, माजी महापौर सीमा भोळे, दीपक सूर्यवंशी, डॉ. नीलेश चांडक, डॉ. पी.आर. चौधरी, बाळासाहेब सूर्यवंशी, लखीचंद जैन, प्रशांत कोठारी आणि सपन झुनझुनवाला यांनी विशेष सहकार्य केले.
याप्रसंगी महावीर सहकारी बँकेचे संचालक भास्कर कोळी, माजी सैनिक योगेश नेमीचंद पाटील, शैला चौधरी, दीपक विधाते, विक्रांत चौधरी, अक्षय सोनवणे, सागर पगारीया, चित्रा चौधरी, सुदर्शन पाटील, नंदू बारी, सुनंदा मोझे, सागर परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरीचे ॲड. किशोर पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दीपक परदेशी यांनी केले.