गजानन पाटील | अमळनेर, दि. 29 – भारतीय समाज व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षक दिनाचे आयोजन करून महात्मा फुले हायस्कूलने नवा आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक समरसतेत ज्यांनी संपूर्ण कुटुंबाची राखरांगोळी केली. त्या दाम्पत्याच्या समर्पणाला नजरेआड करणाऱ्या व्यवस्थेला आदर्श उदाहरण यानिमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलने घालून दिला.
इयत्ता दहावीतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकापासून ते शिपायापर्यंत भूमिका साकारत दिवसभर शाळेत अध्यापनाचे कार्य केले. प्रशांत पाटील याने मुख्याध्यापकाची भूमिका केली तर यशस्वी पाटील, वैशाली महाजन, रजनी महाजन, गायत्री पाटील, श्वेता पाटील, विशाल पाटील, चेतन महाजन, भूपेंद्र महाजन यांनी शिक्षकाची भूमिका केली.
तर शिक्षकेत्तर कर्मचारी लिपिक म्हणून प्रदीप माळी तर शिपायाची भूमिका धनंजय महाजन, भूषण महाजन याने अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन अध्यक्षस्थानी होते प्रमुख अतिथी आय. आर. महाजन ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के, एस .के महाजन, एच ओ. माळी होते
शाळेतील विद्यार्थी यशस्वी पाटील, शिवम पाटील, प्रशांत पाटील यांनी शिक्षकाची भूमिका करीत असताना आलेले अनुभव कथन करताना केले. शिक्षक अध्यापन करत असताना बऱ्याच वेळा विद्यार्थी गोंधळ करतात. पण आज आम्ही अध्यापन करत होतो. काही विद्यार्थी गोंधळ करण्याचा प्रयत्न करत होते, तर विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकांना किती अडचणी येतात ते आम्ही प्रत्यक्ष पाहिले व अनुभव घेतला. आज आम्हाला शिक्षक होण्याची एक चांगली संधी महात्मा फुले यांच्या स्मृतीदिना निमित्ताने शाळेतील शिक्षकांनी उपलब्ध करून दिली व आमची सांस्कृतिक विभाग प्रमुख आय आर महाजन सर यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केल्याचे विद्यार्थ्यांनी बोलताना सांगितले.
अध्यक्षीय भाषणात शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी सर्व विद्यार्थी शिक्षकांचे कौतुक केले. महात्मा फुले स्मृतीदिन शाळेत दरवर्षी शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. महात्मा फुले यांचे कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार आत्मसात करून त्यांच्या मार्गावर मार्गक्रमण करा असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीतील विद्यार्थी शिवम पाटील याने केले तर, आभार प्रदर्शन विशाल पाटील यांनी मानले. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.