अमळनेर, दि. 29 – २६ वी राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा करूक्षेत्र हरियाणात सुरू आहे. यात भारत भरातून प्रत्येक राज्याचे विजेते सहभागी झाले आहेत. त्यात महाराष्ट्रातर्फे नवी मुंबईची स्नेहल शत्रुघ्न माळीने सबज्युनिअर गटात ३० किमी अंतराच्या अत्यंत अटीतटीच्या स्पर्धेत मागील रेकॉर्ड ब्रेक करून पहिला क्रमांक मिळवत सुवर्ण पदक पटकाविले.
स्नेहल मूळ अमळनेर येथील निवासी व हल्ली नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलीस निरीक्षक असलेल्या शत्रुघ्न माळी यांची कन्या आहे. विशेष म्हणजे स्नेहलच्या निमित्ताने महाराष्ट्राला पहिल्यांदाच हे पदक मिळाले आहे. या स्पर्धेत देशभरातून ४२ स्पर्धक सहभागी झाले होते .त्यात अनेक स्पर्धक राष्ट्रीय व राज्यस्तरीय विजेते होते.
स्नेहलला सोनी स्पिंग क्लबचे आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट राजेंद्र सोनी यांचे मार्गदर्शन लाभले. आगामी काळात स्नेहल भारताकडुन आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. तीने गतवर्षी २५ वी राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत कास्य पदक मिळवले होते. या यशाबद्दल नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेल महापौर डाॅ कविता चौतमोल, महाराष्ट्र सायकलिंगचे अध्यक्ष प्रताप जाधव तसेच अमळनेर येथील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्नेहलचे कौतुक केले आहे.