जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात झालेल्या जुन्यावादातुन घरातील कुटुंबावर चॉपर आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना धक्कादायक घटना आज रविवारी १९ जानेवारी ला घडली. या प्राणघातक हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली असून जखमी झालेल्या दोन्ही गटातील ७ जणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मुकेश रमेश शिरसाठ (वय- २६ रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. पिंप्राळा हुडको परिसरामध्ये राहणाऱ्या शिरसाठ कुटुंबावर जुन्या वादातून सात ते आठ जणांनी चॉपर, कोयता, चाकू आणि लाकडी काठी जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये निळकंठ सुखदेव शिरसाट (वय-४५), कोमल निळकंठ शिरसाठ (वय २०), करण निळकंठ शिरसाठ (वय-२५), ललिता निळकंठ शिरसाठ (वय-३०), मुकेश रमेश शिरसाठ (वय-२६), सनी निळकंठ शिरसाठ (वय २१), सोन्या रमेश शिरसाठ (वय २०) सर्व रा.पिंप्राळा हुडको, जळगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
यातील मुकेश रमेश शिरसाठ (वय-२६) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. तर दुसऱ्या गटातील आणखी दोन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मित्र परिवारासह नातेवाईकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. ही घटना घडल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सपोनि विठ्ठल पाटील व त्यांचे सहकारी, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच शासकीय रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान या घटनेबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.