जळगाव, (प्रतिनिधी) : सेवानिवृत्त कर्मचारी महिलेचे बंद घर फोडून चोरट्यांनी चिल्लर, चांदीचे देवीदेवता असा सुमारे १५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना हिराशिवा कॉलनी, निमखेडी शिवारात उघडकीस आली.
लीलाबाई रघुनाथ भालेराव या (वय ७५, रा. गट नं. ९९, प्लॉट नं. २०, हिराशिवा कॉलनी) सेवानिवृत्त असून ९ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घराच्या प्रवेश दरवाजाला कुलूप लावून गावाला गेल्या. या बंद घराला लक्ष्य करत चोरट्यांनी दरवाजाचा कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटाचे कुलूप तोडून सामान अस्ताव्यस्त केला. कपाटात ठेवलेले चांदीचे देवपूजेचे लक्ष्मी व गणपतीचे नाणे, अंदाजे पाच हजार रुपयांची चिल्लर असा ऐवज चोरुन नेला.
महिला घरी आल्या असता त्यांना दरवाजाचा कोंडा तुटलेला दिसला. घरात सामान विखरून पडलेला होता. कपाट उघडे होते. तर मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. गुन्ह्याचा तपास पो.हे.कॉ. धनराज पाटील हे करीत आहेत.