जळगाव शहरातील घटना ; चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा
जळगाव (प्रतिनिधी) : लिफ्ट मागण्याचा बहाणा करत चौघां संशयतांनी आवाज देत पिकअप वाहन कार थांबविली. त्यानंतर दगड मारून संशयितांनी पिकअपची काच फोडली. त्यानंतर कार चालकाच्या हातातील मोबाइल हिसकावून चौघे चोरटे पसार झाले. मंगळवार दिनांक ३० रोजी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजीनगर स्मशान भूमीकडे जाणाऱ्या पुलावर ही घटना घडली. याप्रकरणी बुधवार दिनांक ३१ जुलै रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कासिम अब्दुल रहीम खाटीक (वय ४४, रा. रामनगर, मेहरूण) हे शेळ्या-बोकड खरेदी-विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रात्री ते पिकअप गाडी (क्रमांक एमएच-५०-७२२०) घेऊन लेंडी नाल्याजवळील शिवाजीननगर स्मशानभूमीकडे आहेत. जाणाऱ्या पुलावरून वाहन नेत होते. त्यावेळी २० ते २५ वर्षीय अंदाजे वयोगटातील चार संशयितांनी त्यांना आवाज देत वाहन थांबविण्यास लावली. चालकाने वाहन थांबविताच एका संशयिताने हातातील दगड फेकत पिकअपचा प्रथमदर्शनी काच फोडला.
अन्य संशयितांनी चालकाच्या हातातील ७ हजार रुपये किमतीचा मोबाइल जबरीने हिसकावून पलायन केले. प्रकार कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भेट देऊन घटना जाणून घेतली. या प्रकरणी कासिम अब्दुल यांच्या तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात चार अनोळखी संशयितांविरोधात जबरी चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार सुनील पाटील करीत आहे.