जळगाव, (प्रतिनिधी) : “निवडणुकीत पक्षाशी बंडखोरी करणाऱ्यांना जनता कधीही निवडून देत नाही. उमेदवारी देताना आमदारांच्या परिवारात तिकीट द्यायचे नाही, असे आमचे धोरण निश्चित होते; मात्र काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आणि पर्यायी उमेदवार नसल्याने नाईलाजास्तव काही निर्णय घ्यावे लागले,” असे रोखठोक मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
घराणेशाही आणि बंडखोरीवर भाष्य..
निवडणुकीतील तिकीट वाटपावरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, भाजपने घराणेशाही टाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. परंतु, काही मतदारसंघांत ऐनवेळी अर्ज भरले गेले आणि तिथे सक्षम पर्यायी व्यवस्था नसल्याने पक्षाला तडजोड करावी लागली. बंडखोरीचा महायुतीला कोणताही फटका बसणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
विलासराव देशमुखांबद्दल आदर कायम..
भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारले असता, फडणवीसांनी तत्काळ पक्षाची भूमिका स्पष्ट केली. “रवींद्र चव्हाण यांचे विधान हे त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. पक्ष म्हणून आम्हाला विलासराव देशमुख यांच्याबद्दल नितांत आदर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांचे योगदान मोठे असून त्याबाबत दुमत असण्याचे कारण नाही,” असे सांगत त्यांनी वादावर पडदा टाकला.
VIDEO
महायुतीच्या विजयाचा विश्वास..
पत्रकार परिषदेच्या शेवटी फडणवीस यांनी महायुतीमधील एकजुटीचा पुनरुच्चार केला. “बंडखोरांना जनतेचा पाठिंबा मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. विकासकामांच्या जोरावर महायुतीचे उमेदवार बहुमताने विजयी होतील,” असा विश्वास व्यक्त करत त्यांनी मतदारांना महायुतीला साथ देण्याचे आवाहन केले.








