जळगाव, (प्रतिनिधी) : निवडणुकीचे वारे वाहू लागताच जळगावमधील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. प्रभाग ७ ‘ड’ मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारासाठी आज सकाळी भव्य रॅली काढण्यात आली. गणेश कॉलनीसह प्रभागातील विविध परिसरात या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
प्रचारादरम्यान उमेदवारांनी प्रभागातील विविध गल्ल्यांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. या रॅलीत प्रभाग ७ चे भाजपचे चारही उमेदवार दीपमाला काळे, अंकिता पाटील, विशाल भोळे आणि चंद्रशेखर अत्तरदे यांनी एकत्र येत शक्तीप्रदर्शन केले. त्यांच्यासोबत पक्षाचे पदाधिकारी चेतन तिवारी, मयूर भोळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
रॅलीमध्ये तरुणांचा सहभाग आणि उत्साह विशेष लक्षणीय ठरला. ठिकठिकाणी स्थानिक महिलांनी उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचे औक्षण करून आणि पुष्पहार घालून स्वागत केले. “प्रभागाचा विकास आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी भाजप हाच सक्षम पर्याय आहे,” असे मत यावेळी मतदारांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना चंद्रशेखर अत्तरदे म्हणाले की, “प्रभागातील रस्ते, पाणी आणि स्वच्छतेचे प्रश्न मार्गी लावणे ही आमची प्राथमिकता आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि केंद्रातील व राज्यातील योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना साथ द्यावी.”








