जळगाव, (प्रतिनिधी) : ऑनलाइन शेअर्स ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून भुसावळ येथील एका ४९ वर्षीय नागरिकाची तब्बल १९ लाख रुपयांहून अधिक रकमेची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीने सायबर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नत्थू प्रजापती प्रसाद (वय ४९, रा. भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ९ ऑगस्ट ते २४ नोव्हेंबर २०२५ या तीन महिन्यांदरम्यान ही फसवणूक करण्यात आली. नत्थू प्रसाद यांना सुरुवातीला ‘५५७ एस-के स्ट्रॅटेजी क्लब’ आणि ‘डी ३ स्ट्रॅटेजिक ट्रेडिंग ग्रुप’ नावाच्या दोन ऑनलाइन ग्रुप्समध्ये सामील करण्यात आले. या ग्रुप्सवर कार्यरत असलेल्या प्रीती यादव आणि नीता जैन नावाच्या दोन महिला आणि ॲडम सॅमनिओटिस नावाच्या ग्रुप ॲडमिनने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. शेअर्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास भरघोस नफा मिळेल, असे खोटे आश्वासन त्यांनी नत्थू प्रसाद यांना दिले.
विविध खात्यांत पैसे ट्रान्सफर..
या आश्वासनांवर विश्वास ठेवून फिर्यादी नत्थू प्रसाद यांनी वेळोवेळी आरोपींनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा केले. त्यांनी एकूण १९ लाख १ हजार ९९९ रुपये इतकी मोठी रक्कम आरोपींना दिली.
मात्र, इतकी मोठी रक्कम स्वीकारल्यानंतर आरोपींनी नत्थू प्रसाद यांना कोणताही नफा किंवा त्यांची मूळ गुंतवलेली रक्कम देखील परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नत्थू प्रसाद यांनी तातडीने जळगाव येथील सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..
फिर्यादी नत्थू प्रसाद यांच्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलिस ठाण्यात प्रीती यादव, नीता जैन आणि ॲडम सॅमनिओटिस या तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. नागरिकांनी ऑनलाइन ट्रेडिंगच्या आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.








