जळगाव, (प्रतिनिधी) : शहराच्या मध्यभागी असलेल्या वाघ नगर परिसरात छुप्या पद्धतीने चालणाऱ्या एका अवैध वेश्या व्यवसायाचा मोठा प्रकार पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्या विशेष पथकाने उघडकीस आणला आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळावरून तीन महिलांना आक्षेपार्ह स्थितीत ताब्यात घेतले आहे.
पोलिस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांना वाघ नगर भागातील एका घरात अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत, त्यांनी तातडीने माहितीची खातरजमा केली आणि एक विशेष पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. या पथकामध्ये अॅन्टी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट च्या कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.
गणापुरे यांच्या आदेशानुसार विशेष पथकाने वाघ नगर येथील संशयित घरावर अचानक छापा टाकला. या छाप्यादरम्यान, घरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले आणि पोलिसांनी तात्काळ तीन महिलांना आक्षेपार्ह स्थितीत ताब्यात घेतले. या कारवाईमुळे परिसरात एकच चर्चा सुरू झाली असून, अवैद्य धंद्यांवर अंकुश बसणार असल्याची आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अवैध धंद्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे? तसेच, या वेश्याव्यवसाय रॅकेटमध्ये आणखी किती जण सामील आहेत, याचा सखोल तपास जळगाव तालुका पोलीस करत आहेत. या तपासातून या रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.









