जळगाव, (प्रतिनिधी) : देशाला विश्वस्तरावर अग्रस्थानावर नेण्यासाठी सरकारस्तरावर होणाऱ्या विविध योजनांपैकी एक असणाऱ्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देऊन देशातल्या व्यावसायिकांना मुख्य धारेत आणून राष्ट्राला मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त फेम ( फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग इंटरप्रीनर्स) आयोजित आर्टवर्क स्पर्धेत “स्वदेशी खरेदी करा” आवाहन करणारे आर्टवर्क महाराष्ट्रभरातून जाहिरात संस्था, कला महाविद्यालय आणि व्यावसायिक कलाकारांकडून मागवण्यात आले होते.
या स्पर्धेत जळगावच्या पालवी जैन हिच्या कलाकृतीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. तिच्या आर्टवर्कमधे परदेशी “प्रादा” पादत्रांणासोबत आपल्या कोल्हापुरी चप्पल अभिमानाने मिरवत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी प्रादा या ब्रँड ने कोल्हापुरी चपलेचे डिझाईन कॉपी केल्याने एक वाद सोशल मीडियावर खूप ट्रेंड झाला होता, या वादाच्या पार्श्र्वभूमीचा धागा पकडत पालवीने हे आर्टवर्क सादर केले होते. अकरा हजार रुपये आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे आहे.
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, चित्रकार विकास मल्हारा, परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील तसेच राज्यातील कला आणि जाहिरात क्षेत्रातील तसेच जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पालवीचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे. पालवी ही नीलिमा जैन आणि जैन इरिगेशनचे कला विभागाचे विजय जैन यांची मुलगी आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत पालवीचे वडील विजय जैन यांनी सुध्दा सहभाग घेतला होता.










