जळगाव, (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर महसूल विभागाच्या वतीने जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील ‘उजाड कुसुंबा’ येथे आयोजित शिबिरामुळे येथील रहिवाशांचे जीवन उजळले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात एकूण १२२ लाभार्थ्यांना विविध सरकारी योजनांचे लाभ आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.
जळगावचे उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे शिबिर यशस्वी झाले. शिबिरामध्ये ३० लाभार्थ्यांना रेशन कार्डचे वाटप करण्यात आले, तर १२ पात्र लाभार्थ्यांना ‘संजय गांधी निराधार योजना’ (SGNY) अंतर्गत प्रमाणपत्रे देण्यात आली. याशिवाय, ८० लाभार्थ्यांचे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज भरून घेण्यात आले.
समाजाच्या तळागाळातील गरजूंपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवल्यामुळे येथील ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार मानले. या शिबिरात महसूल नायब तहसीलदार राहुल वाघ, मंडळ अधिकारी सारिका दुरगुडे, ग्राम महसूल अधिकारी चंद्रकांत ठाणगे, मयूर महाले (शिरसोली प्र न), भावेश रोहिमारे (शिरसोली प्र बो), निधी मानेकर (कंडारी), प्रतीक्षा नवले (चिंचोली), सुप्रिया डोंगरे (धानवड), महसुल सेवक गणेश घुगे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे शिबिर यशस्वी ठरले. या उपक्रमामुळे ‘उजाड कुसुंबा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या भागाला आता ‘उज्वल कुसुंबा’ अशी नवी ओळख मिळाली आहे.