जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १२ चे माजी नगरसेवक अनंत हरीचंद्र जोशी, ज्यांना बंटीभाऊ या नावानेही ओळखले जाते, यांनी शुक्रवारी (१ ऑगस्ट) दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्या मृत्यूने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली असून, त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
घटनेचा तपशील..
अनंत जोशी (वय ४८, रा. ओंकारेश्वर मंदिराजवळ) हे शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे माजी नगरसेवक होते. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले होते. शुक्रवारच्या दिवशी दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान ते त्यांच्या घरातील वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत गेले होते. संध्याकाळपर्यंत ते खाली न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर अखेर वरच्या मजल्यावरच्या खोलीत त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
रुग्णालयात मोठी गर्दी..
कुटुंबीयांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच राजकीय नेते, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने रुग्णालयात गर्दी केली होती. त्यांच्या हसऱ्या आणि मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्वांमध्ये लोकप्रिय होते, त्यामुळे त्यांच्या आत्महत्येच्या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. त्यांच्या पश्चात त्यांची आई-वडील, पत्नी आणि मुलगा राजवीर असा परिवार आहे.