जळगाव, (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे डॉक्टर सेलचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डॉ. नितीन पाटील यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जळगाव येथे हा प्रवेश सोहळा पार पडला. डॉ. पाटील यांच्या प्रवेशामुळे धरणगाव तालुक्यात भाजपची ताकद आणखी वाढणार असल्याचे मानले जात आहे.
धरणगाव तालुक्यातील वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात डॉ. पाटील यांचे मोठे योगदान आहे. रुग्णसेवेसोबतच सामाजिक कार्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. ते शरद पवार गटाचे पदाधिकारी होते, त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. डॉ. पाटील यांच्यासोबत धरणगाव आणि परिसरातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला. यामध्ये माजी सरपंच संभाजी पाटील (भैय्या पाटील), बिलखेड्याचे माजी सरपंच बंडू दादा काटे, विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील आणि उपसरपंच दिलीप भदाणे यांचा समावेश आहे.
या प्रवेश सोहळ्याला आमदार राजूमामा भोळे, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, संजय गरूड, पी.सी. पाटील यांच्यासह अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.