जळगाव, (जिमाका) : जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मक्याच्या पिकांवर नव्याने अमेरिकन लष्करी अळीचा (Fall Armyworm) प्रादुर्भाव आढळून येत असून, या कीडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना विविध उपाययोजना राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कीडीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीकडे घेऊन जात असून, लक्षणे ओळखून वेळेत उपाय केल्यास नुकसान टाळता येणार आहे. लष्करी अळी ही शेंड्याकडून आत प्रवेश करून मक्याच्या कोवळ्या भागात खूप खोलवर जात असून, पानांवरून झाडाच्या शेंड्यात Y आकाराची छिद्रे दिसतात. अळीचा रंग भुरकट असून शरीरावर पट्ट्यांसारखी रचना आढळते.
या कीडीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी सकाळ-संध्याकाळी निरीक्षण करून अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. किडग्रस्त पिकांच्या शेताची खोल नांगरणी शक्यतो दिवसा करावी म्हणजे पक्षाद्वारे किडीच्या वेगवेगळ्या अवस्था नष्ट करण्यास मदत होईल. पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे व या किडीचे पतंग आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे व कामगंध सापळ्याचा वापर करावा. पिकावरील अंडीसमूह तसेच अळ्या हाताने गोळा करून नष्ट कराव्यात. टेलेनोमस रेमस व ट्रायकोग्रामा या परोपजीवी किटकांचे एकरी ५० हजार अंडी याप्रमाणे शेतात सोडावे. त्यानंतर ४ ते ५ दिवसांपर्यंत रासायनिक किटकनाशकांची फवारणी करू नये. अॅडोडिरॅक्टीन १५०० पीपीएम किंवा निंबोळी अर्क ५ टक्के ५० मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. न्युमोरिया रिलई किंवा मेटा-हायझियम अॅनीसोप्ली या जैविक किटकनाशकांची ४० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी.
कीड जास्त प्रमाणात आढळून आल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर आवश्यक आहे. त्यासाठी काबॉफ्युरॉन, लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन, अशा कीटकनाशकांची शिफारस करण्यात आली आहे. यांचा वापर ठराविक प्रमाणात आणि कृषी तज्ञांच्या सल्ल्याने करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजिकच्या कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच www.krishi.maharashtra.gov.in या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.