जळगाव, (प्रतिनिधी) : मुस्लिम बांधवांच्या नवीन वर्षाची सुरुवात तसेच पवित्र मोहर्रम महिन्याच्या निमित्ताने शहरातील अहले सुन्नत वल जमात आणि गुलामाने शोहदा-ए-करबला व गुलामाने अहेले बैत यांच्यातर्फे सुन्नी ईदगाह मैदान, नियाज अली नगर येथे ‘शजरकारी’ (वृक्षारोपण) मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेचे उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुन्नी ईदगाह ट्रस्ट आणि सुन्नी जामा मस्जिदचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली यांनी मोहर्रमचे महत्त्व आणि इस्लाम धर्मात वृक्ष व निसर्गाच्या संवर्धनाला दिलेले महत्त्व यावर मार्गदर्शन केले. प्रेषितांच्या शिकवणीनुसार वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी शंभर कडुलिंबाची देशी रोपे लावून शजरकारी करण्यात आली. या मोहिमेला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह सै. अयाज अली नियाज अली, इकबाल वझीर, शेख जमील, नाझीम पेंटर, हाजी रशीद कुरेशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. इस्लाम धर्मात वृक्षारोपणाला मोठे पुण्य मानले जाते आणि विनाकारण वृक्ष तोडणे गुन्हा मानले जाते, या शिकवणीनुसार ही मोहीम राबवण्यात आली.